Categories: Featured

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावरून उदयनराजे कडाडले…

पुणे। देशभरात वादंग माजलेल्या  जय भगवान गोयल यांच्या आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरुन  भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली सडेतोड भुमिका मांडलीय. यावेळी उदयनराजेंनी यांनी जय भगवान गोयल यांच्यावर हल्ला चढवलाच, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही नाव न घेता हल्ला चढवला. 

उदयनराजे म्हणाले की,  या जगात जाणता राजा फक्त छत्रपती शिवराय होते. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. तसंच शिवसेना भवनावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो खाली का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ठाकरे, पवारांवर उदयनराजेंची जोरदार टीका

शिवाजी महाराजांकडे महाराष्ट्राचं नव्हे तर जगातील आदर्श व्यक्ती म्हणून पाहिलं जातं, शिवरायांची तुलना अनेकवेळा झाली, लोकांनी बुद्धी गहाण ठेवलीय का माहित नाही, काल-परवाचं पुस्तक पाहून वाईट वाटलं. गोयल नावाच्या लेखकाने मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी केली, महाराष्ट्रात जाऊ द्या, जगात शिवरायांशी कोणाची तुलना होऊ शकत नाही, जाणता राजा म्हणून अलिकडे उपमा दिल्या जातात, मात्र जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी राजा आहे, असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. 

जाणता राजा उपमा देताना शिवाजी महाराजांनी त्या काळात काय केलं ते पाहावं, कार्यपद्धतीने जगाला दाखवून दिलं, अनेक जाती धर्मातील लोक माझे जीवलग मित्र, कुठल्याही देशात धार्मिक स्थळी योद्ध्यांचा फोटो नसतो, केवळ आपल्या शिवरायांचा फोटो असतो, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

“मागच्या जन्मात मी काहीतरी पुण्य काम केलं असावं म्हणून या घरात जन्माला आलो. पण मी कधी महाराजांचे वंशज म्हणून नावाचा दुरुपयोग केला नाही. राजेशाही गेली लोकशाही आली मग आम्ही ती मान्य केली”.
उदयनराजे काय म्हणाले वाचा सविस्तर

सर्वात प्रथम माझ्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. आज पानिपतचा शौर्य दिवस आहे, या युद्धात जे कामी आले त्यांना श्रद्धांजली वाहतो. ही पत्रकार परिषद घेण्यामागे कोणतेही राजकारण नाही, मी कधी राजकारण केलं नाही करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोण्याबरोबरही केली जाते याचं वाईट वाटतं. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली का ते कळत नाही.

काल जे पुस्तक प्रकाशित झालं मी वाचलं नाही पण वाईट वाटतं. जो गोयल म्हणून लेखक आहे त्याने मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केली. वास्तविक जगात कोण्याचीच तुलना शिवाजी महाराजांशी होऊ शकत नाही. कोणालाही जाणता राजा म्हणता, त्याचाही मी निषेध करतो. जाणता राजा फक्त शिवाजी महाराज. त्यांनी जे कार्य केले ते जगाला दाखवून दिलं, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

एकमेव छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले ज्यांची प्रतिमा आपण देवघरात ठेवतो. तुलना तर सोडून द्या पण महाराजांच्या जवळपास सुद्धा जाऊ शकत नाही. शिवाजी महाराजांचं आत्मचरित्र वाचतो, त्यानंतर त्यांच्यासारखं वागायचं प्रयत्न करतो, म्हणून आपण शिवाजी महाराज होऊ शकत नाही. काही गळ्यात बिनपट्टे असणारे लोक लुडबुड करतात त्यांचं नाव घेऊन मला त्यांना मोठं करायचं नाही. मी राजघराण्यात जन्माला आलो हे माझं सौभाग्य समजतो. आम्ही महाराजांचे वंशज म्हणून कधी नावाचा दुरुपयोग केला नाही. राजेशाही संपल्यावर आम्ही लोकशाही मान्य केलं.  सर्वधर्मसमभाव ही कल्पना कुठं गेली. सोयीप्रमाणे लिखाण करायचं? त्याला बाळकडू दिल नव्हतं, मानधन दिले नव्हते, असा हल्लाबोल उदयनराजे भोसलेंनी केला.

शिवसेनेवर हल्लाबोल

शिवसेना नावावर आम्ही कधी हरकत घेतली नाही, कारण आम्ही जरी वंशज असलो तरी त्यांच्या विचारांचा वारसा हा सर्व देशाला लाभला आहे. तुम्ही सर्वजण महाराजांचे कुटुंब आहे, राजांनी कधी तू कोणत्या जातीचा, किंवा धर्माचा असे मतभेद केले नाही. शिवसेना भवनावर महाराजांची मूर्ती खाली, वरती फोटो कुणाचा पाहा, वंशज म्हणून तुम्ही आमच्यासारख्यांवर टीका करता, शिवाजी महाराजांनी दिलेली आम्ही शिकवण पाळतो, निवडून येऊनही मी राजीनामा दिला, जे माझ्या बुद्धीला पटत नाही ते मी करत नाही, असं उदयनराजे म्हणाले.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Aaj Ke Shivaji-Narendra Modi