Categories: कृषी

PM किसान सन्मान निधीचा ७ वा हप्ता येण्याआधी ‘हे’ बदल जाणून घ्या

नवी दिल्ली | पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा आतापर्यंत देशातील ११ कोटी पेक्षा अधिक शेतकर्‍यांना लाभ झाला आहे. या योजनेंतर्गत मोदी सरकारने आतापर्यंत सहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. तर आता सातव्या हप्त्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक आहेत. २४ फेब्रुवारी २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सुरू झालेली ही योजना देशातील सर्वात लोकप्रिय योजना ठरली. 

पीएम किसान योजनेत स्थापनेपासूनच बरेच बदल करण्यात आलेत. जसे आधार कार्ड अनिवार्य करणे, होल्डिंग मर्यादा हटविणे, स्वत: ची नोंदणी स्वतः करणे असे अनेक बदल या योजनेत करण्यात आलेत. याबरोबर आणखी काही महत्वाचे बदल टप्प्या टप्प्याने आणि गरजेनुसार करणे सूरूच आहे. असेच काही महत्वाचे बदल जे तुम्हाला माहित असणे फार गरजेचे आहे. ते या लेखात देत आहोत. 

किसान क्रेडिट कार्ड- https://pmkisan.gov.in/Documents/Kcc.pdf
पीएम किसान सन्मान निधी योजनेत किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) देखील जोडले गेले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांसाठी केसीसी मिळवणे अत्यंत सोपे झाले आहे. केसीसीवर ४% व्याज दराने ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते.
मानधन योजना – https://pmkmy.gov.in/
पंतप्रधान-किसान सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याला पीएम किसान मानधन योजनेचाही लाभ घेता येतो. यासाठी कोणतीही वेगळी कागदपत्रे द्यावी लागत नाहीत. या योजनेंतर्गत शेतकरी पंतप्रधान-किसान योजनेतून मिळणाऱ्या लाभामधून पीएम किसान मानधन योजनेच्या लाभास पात्र ठरतात.
आधारकार्ड अनिवार्य – https://pmkisan.gov.in/UpdateAadharNoByFarmer.aspx
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सर्वात महत्वाचा घटक आहे. आधार कार्डशिवाय या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. लाभार्थ्यांसाठी सरकारने आधारकार्ड अनिवार्य केले आहे. योजनेच्या सुरूवातीस केवळ २ हेक्टर किंवा ५ एकर शेती योग्य शेती करणारे शेतकरीच पात्र ठरविले गेले. आता मोदी सरकारने हे बंधन संपुष्टात आणले आहे जेणेकरुन १४.५ कोटी शेतकर्‍यांना त्याचा लाभ मिळू शकेल. कारण सरकारने योजनेच्या सुरवातीलाच देशातील १४.५ कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्याचे धोरण निश्चित केले होते.
स्वयं नोंदणी सुविधा – https://pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx
पीएम किसान योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी मोदी सरकारने लेखपाल, कृषी अधिकारी, सर्विस सेवा सेंटर यांना भेट देण्याचे बंधन संपवले. त्यामुळे  शेतकरी स्वत: ची नोंदणी स्वत: करू शकतात. घर बसल्या ही नोंदणी करणे शक्य आहे. आपल्याकडे खाते नंबर, आधार कार्ड, मोबाइल नंबर आणि जमिनीच्या सातबाराची माहिती असल्यास, pmkisan.gov.in  वर फार्मवर कॉर्नरवर जाऊन स्वतःची नोंदणी स्वतः करता येते.
स्थिती तपासणी सुविधा – https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx
या योजनेत सरकारने आणखी एक महत्वाचा बदल केला. शेतकऱ्यांना नोंदणीनंतर आपली स्थिती स्वतः तपासणे यामुळे शक्य झाले. आपल्या अर्जाची स्थिती काय आहे, बँक खात्यात किती हप्ते आलेत, इ. माहिती कोणताही शेतकरी पीएम किसान पोर्टलवर जाऊन पाहू शकतो. त्यासाठी आपला आधार क्रमांक, मोबाइल किंवा बँक खाते क्रमांक प्रविष्ट करुन स्ही माहिती मिळवता येते.

दरम्यान पीएम किसान योजनेला देखील गैरप्रकारांचे ग्रहण लागल्याने सरकारने या योजनेविषयीच्या नियम अटी कडक केल्या आहेत. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी आपला येणारा हप्ता जमा होण्यापूर्वी आपल्या खात्याचा तपशील जाणून घ्यावा. त्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर स्थिती तपासणे घेणे गरजेचे आहे.

Team Lokshahi News