Categories: कृषी सामाजिक

समजून घ्या ‘८ अ’ उतारा म्हणजे काय? आणि जाणून घ्या त्याचे फायदे..!

अनेकांना सातबारा, आठ अ, मोजणी, वारस नोंद, पीकपाणी हे शब्द माहित असतात. ग्रामीण भागातील विचार करता या दस्तऐवजांची नावे सातत्याने कानावर पडत असली तरी बऱ्याचदा याची सखोल माहिती नसते. आजच्या लेखात आपण अशाच एका दस्तऐवजाची माहिती घेणार आहोत. ज्याची सखोल माहिती शेतकऱ्याला असणे फार गरजेचे आहे. ‘आठ अ’ चा उतारा असे या दस्तऐवजाचे नाव असून तो कसा वाचायचा याचीही माहिती यामुळे होईल. (निळ्या अक्षरांवर क्लिक करून तुम्हीही घर बसल्या मिळवू शकता तुमचा ‘८ अ’ उतारा)

साधारणपणे आपल्याला ‘सात/बारा’ उताऱ्यावरून जमिनीची मालकी, त्या जमिनीवरील पिके,एकूण क्षेत्र, कर्ज अशा अनेक गोष्टी कळतात. पण अनेकांना ‘आठ अ’ चा उतारा कळत नाही. तो कसा काढायचा हेही काही लोकांना माहिती नसते. त्याचा काय फायदा होतो हेदेखील माहित नसते. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे ‘आठ अ’च्या उताऱ्यावरून तुम्हाला एकाच व्यक्तीच्या ‘त्या’ गावातील एकूण जमिनींविषयी सगळी माहिती एकाच ठिकाणी मिळते.

आपण ‘आठ अ’चा उतारा कसा वाचायचा हे पाहू.
जर तुम्ही ऑनलाईन आठ अ चा उतारा काढला तर तुम्हाला सर्वात वरती
१) डाव्या कोपऱ्यात वर्ष दिसेल
२) उजव्या कोपऱ्यात तुम्ही ज्या दिवशी उतारा काढत आहेत त्याची तारीख येते
३) त्यानंतर खाली डाव्या बाजूला गावाचे नाव, मध्यभागी तालुका आणि उजव्या बाजूला जिल्हयाचे नाव असते.

‘आठ अ’ उताऱ्यात सात रकाने म्हणजेच कॉलम दिले आहेत ते कसे वाचायचे आपण पाहू
१) पहिला कॉलम : गाव नमुना सहामधील नोंद हा पहिला रकाना असतो त्यामध्ये खातेदाराचा नोंद क्रमांक असतो. आणि क्षेत्र वैयक्तिक आहे किंवा सामायिक आहे याची नोंदणी केलेली असते. त्यामुळे आपल्याला जमिनीची मालकी व्यक्तिगत आहे किंवा सामायिक आहे हे कळते.
२) दुसरा कॉलम : या कॉलम किंवा रकान्यात भूमापन क्रमांक आणि उपविभाग क्रमांक असतो. त्याच कॉलममध्ये खातेदाराच नाव असते. जर क्षेत्र सामायिक असेल तर सगळ्यांची नावे तिथे असतात. या कॉलममध्ये त्या व्यक्तीच्या नावावर किती आहे आणि ते कोणकोणत्या गटात आहे हे आपल्याला कळते.
३) तिसरा कॉलम : या कॉलममध्ये किंवा रकान्यात त्या व्यक्तीच्या नावावर त्या गावात एकूण किती क्षेत्र आहे हे आपल्याला कळते.
४) चौथा कॉलम : चौथा कॉलम हा आकारणी किंवा जुडीचा असतो. यामध्ये प्रत्येक जमीनीवर किती कर लावलेला आहे हे आपल्याला कळते. हा कर रुपये आणि पैशात असतो म्हणजे १०.५० रुपये. यातून आपल्याला त्या व्यक्तीच्या वेगवेगळ्या गटातील जमीनीवर किती कर आकारला जात आहे ते कळते.
५) पाचवा कॉलम : पाचवा कॉलम हा दुमला जमिनीवरील नुकसान हा असतो.
६) सहावा कॉलम : हा स्थानिक करांचा कॉलम आहे. याचे दोन उपप्रकार आहेत. सहा (अ) मध्ये जिल्हापरिषदेने जमीनीवर किती कर लावला आहे हे समजते. आणि सहा (ब) मध्ये ग्रामपंचायतीने किती कर लावला आहे हे कळते.
७) सातवा कॉलम : या कॉलममध्ये एकूण करांची बेरीज केलेली असते. यातून त्या व्यक्तीला किती कर भरावा लागतो हे कळते. सगळ्यात शेवटी व्यक्तीचे एकूण क्षेत्र, एकूण कर आकारणी दिलेली असते.

आठ अ चा फायदा
१) एकाच मालकाची वेगवेळ्यात गटात असलेली एकूण जमीन कळते.
२) प्रशासनाला कर गोळा करण्यासाठी उपयुक्त
३) जमिनीची खरेदी विक्री करत असताना जमीन घेणाऱ्या माणसाला ती जमीन नक्की कुणाच्या नावावर आहे याची माहिती मिळते. त्यामुळे फसवणुकीला आळा बसतो.

 1. ‘आठ अ’चा उतारा कसा मिळवायचा
  1. https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या वेबसाईटवर जा
  2. विभाग निवडा
  3. ‘आठ अ’ वर क्लीक करा
  4. त्यांनतर जिल्हा, तालुका आणि गावावर क्लिक करा
  5. खाते नंबर क्लीक करून तो छोट्या बॉक्समध्ये लिहा
  6. त्यांनतर सर्चवर क्लिक करा
  7. तुम्हाला तुमचा ‘आठ अ’ चा उतारा मिळतो.
  8. तलाठी कार्यालयातून देखील आठ अ उतारा घेता येतो.
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: 7 12 उतारा महाराष्ट्र 2020 7 12 कसा बघायचा 7/12 उतारा ७/१२ उतारा 7/12 उतारा महाराष्ट्र राज्य 7/12 उतारे 8 a asesement document ८ अ आठ अ उतारा सात-बारा (7/12) पाहणे सातबारा उतारा online