मुंबई | सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘क’ आणि ‘ड’ गटाच्या झालेल्या परीक्षांचा पेपर फुटल्यामुळे या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. तसेच या परीक्षा येत्या दोन ते तीन महिन्यांत ‘टीसीएस’ किंवा ‘एमकेसीएल’मार्फत राबविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील 2739 आणि गट ड संवर्गातील 3466 अशा एकूण 6205 पदांसाठी भरती प्रक्रिया गेल्यावर्षी ऑगस्टमध्येच जाहीर करण्यात आली होती. परंतु आता याला जवळपास नऊ महिने उलटले तरी या परीक्षांचा गोंधळ सुरूच असल्याने भरती प्रक्रिया रखडलेली आहे. दुसरीकडे परीक्षार्थीना परीक्षेबाबतही काही ठोस माहिती गेल्या काही महिन्यांमध्ये दिलेली नसल्याने तेही निकालाची वाट पाहत ताटकळत राहिले आहेत.

आरोग्य विभागाच्या या पदांसाठीची भरती परीक्षा सप्टेंबरमध्ये जाहीर केली होती. यासाठी न्यासा कंपनीची निवड सामान्य प्रशासन विभागाने केली होती. परंतु ऐनवेळी या परीक्षेसाठी आवश्यक तयारी कंपनीने न केल्यामुळे नियोजित वेळेच्या काही तास आधी ही परीक्षा रद्द करावी लागली. त्यानंतर कंपनीवर कारवाई करण्याऐवजी पुन्हा याच कंपनीला परीक्षा घेण्याची परवानगी सामान्य प्रशासन विभागाने दिली. त्यानुसार गट क आणि ड संर्वगासाठीची परभरती परीक्षा न्यासामार्फत ऑक्टोबरमध्ये घेण्यात आल्या.

या दोन्ही परीक्षांचे पेपर फुटल्याचे काहीच महिन्यांमध्ये उघडकीस आले आणि याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. यामध्ये पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले असून आरोग्य अभियानाच्या सहसंचालकांसह आणखी काही जणांना यात अटकही झाली आहे. डिसेंबरपासून हा तपास सुरू असूनही परीक्षाबाबतचा ठोस निर्णय सरकारने जाहीर न केल्यामुळे विद्यार्थी वर्गामध्ये मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.