मुंबई | राज्यातील नर्सेसच्या रिक्त जागा तातडीने भरल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागातील 17 हजार रिक्त पदांपैकी 50 टक्के पदे भरण्याची अनुमती दिली आहे. त्यामुळे विभागातील रिक्त पदभरतीला चालना मिळणार असून आगामी कालावधीत ही पदे भरली जातील असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी निधी वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जास्तीचा निधी मिळवू, अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली.शासकीय रुग्णालयाची सेवा, स्वच्छता,भोजन व्यवस्था यामध्ये गुणात्मक बदल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राज्यात आरोग्य संस्थांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे पाच हजार कोटी निधीचा प्रस्ताव दिला आहे. तोही लवकरच मंजूर होईल.
सामान्य जनतेचा सार्वजनिक आरोग्य सेवेवरचा विश्वास वाढावा तसेच ही सेवा परवडणारी, सुलभ आणि दर्जेदार असावी यासाठी प्रयत्न सुरु असून राज्यातील जुन्या रुग्णवाहिका बदलण्यात येत आहेत. पुढील आठवड्यात 500 नवीन रुग्णवाहिका दाखल होतील. असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.