Categories: Featured

उत्तरप्रदेशातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी कोल्हापूरात AISF आणि AIYF कडून तीव्र निदर्शने

कोल्हापूर | उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी भागात एका १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचे तीव्र पडसाद कोल्हापूरातही उमटलेत. याप्रकरणी अखिल भारतीय नौजवान सभा आणि ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, कोल्हापूर यांच्या वतीने भर पावसात निदर्शने करत निषेध व्यक्त करण्यात आला. 

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दलित समाजातील १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला क्रूरपणे मारण्यात आलं. रामराज्याचं स्वप्नं दाखवणाऱ्या उत्तरप्रदेशातील खरी स्थिती मात्र जंगलराज पध्दतीची आहे. सरासरी दर दिवशी ४ दलित महिलांवर बलात्कार होत आहेत. अत्याचाराच्या अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना, सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप यावेळी अखिल भारतीय नौजवान सभा आणि ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी केला.

उत्तरप्रदेशात दलित कुटूंबे आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना नेहमीच घडत असल्याचे पहायला मिळते. बऱ्याच वेळा या घटनांच्यामागे राजकीय पार्श्वभूमी किंवा राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्याने गुन्हेगार शिक्षेपासून अलिप्त रहात असल्याचे दिसते. यामुळे कित्येक निष्पाप जीव आजही न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचे पहायला मिळते. इथल्या सरकारची भूमिका कायमच संशयाची असून वारंवार आवाज उठवून ही न्याय मिळत नसल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केलय. 

निदर्शनावेळी, गिरिष फोंडे, प्रशांत आंबी, हरिष कांबळे, धिरज कठारे, आरती रेडेकर, स्नेहल शंकर, जावेद तांबोळी, हर्षवर्धन कांबळे, योगेश कसबे, सौरभ पिवळा, आनंद सातपुते, पंकज खोत हे कार्यकर्ते उपस्थित होते.

काय आहे प्रकरण :
माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेत मुलीवर बलात्कार करून, तिची निर्घृण हत्या करण्यात आलीय. त्यानंतर तिचा मृतदेह उसाच्या शेतात फेकून देण्यात आला. उत्तरप्रदेशातील पकरिया गावात हे कुटुंब राहत होतं. दुपारी ही मुलगी शौचाला चालले असं सांगून घराबाहेर गेली होती. पण बराच वेळ ती घरी परत न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी आणि पोलिसांनी तिचा शोध घेतला असता मृतदेह ऊसाच्या शेतात विचित्र अवस्थेत सापडला होता. मुलीच्या पालकांनी  याबाबतची तक्रार लखीमपूर खिरी पोलीस ठाण्यात दिली होती. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मुलीवर अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं असून या प्रकरणी पोलिसांनी पकरिया गावातील दोघांना सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या आरोपांखाली अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

Team Lokshahi News