कोल्हापूर | राज्यातील मंदिरे लवकरच भाविकांसाठी खुली होण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी या गोष्टींचे पालन करून भाविकांना अंबाबाईचे दर्शन खुले करण्याचा विचार सुरू आहे.
देशातील अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील मंदिरे दर्शनासाठी लवकरच खुली होतील, अशी आशा सर्वसामान्य भाविकांना लागली आहे. पण, मंदिरे खुली झाली तरी भाविकांना सहज देवदर्शन होणे कठीण आहे. कोरोनामुळे राज्य सरकारने अद्याप मंदिरे सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. मात्र, मुंबईत नुकत्याच झालेल्या कोविड टास्क फोर्स बैठकीत येत्या तीन ते चार दिवसांत मर्यादित क्षमतेने मंदिर आणि रेस्टॉरंट सुरू करण्यावर चर्चा झाली आहे.
नवरात्रोत्सव परंपरेनुसारच होणार –
देवीचा शारदीय नवरात्रोत्सव उत्साहातच साजरा होणार आहे. नऊ दिवस देवीची विविध रूपात पूजा बांधली जाईल, नवरात्रोत्सवातील परंपरेनुसार पूजा व सर्व धार्मिक विधी होतील. पण, कोणत्याही प्रकारे मंदिरात किंवा मंदिर परिसरात गर्दी होणार नाही याची खबरदारी देवस्थान समितीकडून घेतली जाईल, असे देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले आहे. शासन आणि मंदिर व्यवस्थापन समितीने अधिकृतरित्या नियमांवली बनवल्यानंतर त्याचे पालन करूनच भाविकांना देवदर्शन घ्यावे लागणार आहे.