– स्नेहल शंकर
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे यावर्षीचा पावसाळा पर्यटनाच्या दृष्टीने अगदी ‘कोरडा’च गेला. जेष्ठातल्या आकाशाच्या घुमटातील पाऊसभरल्या मेघांचे झुंबर ओसरू लागले आहेत. लगोलग आलेल्या आषाढाने सारी सृष्टी सजवून ठेवली आहे. या निसर्गाचं अस्खलित सौंदर्य पाहण्यासाठी प्रत्येक निसर्गवेडा चातकासारखी वाट पाहत होता. आता महाराष्ट्र अनलॉकींगमुळे ही तहान भागवणे शक्य होणार आहे. त्यामुळे नकळतच भटक्यांचे पाय निसर्गाच्या दिशेने वळू लागले आहेत. धुक्याची वाकळ घेतलेला ‘आंबा’ घाट या भटक्यांसाठी पर्वणीच जणू !
शिवकालीन इतिहासाने पावन झालेल्या या भागाला सुंदर नैसर्गिक वारसा लाभलेला आहे. येथील दाट जंगल आणि जैववैविध्याने नटलेल्या डोंगरदऱ्यांचाही अनुभव चित्तथरारक आहे. घाटमाथ्यावरील आंबा गावात राहण्याची सोय उपलब्ध आहे. तिथे राहून आसपासचे जंगल बघण्याची चांगली संधी मिळते. आंब्याच्या अगदी जवळ असलेल्या माणोली बंधाऱ्याभोवती फेरफटका मारून सबंध दिवस पावनखिंडीच्या वाटेवरील जंगलात भटकंती करता येते. मग वाहनाने जाऊन पायी सफर करावी लागते.
आंब्यात काय बघाल
अंबेश्वर देवराई, वाघझरा, दऱ्याचा धबधबा, सासन कडा, आंबा घाट टेबल, सवतीचा कडा, मानोली बंधारा, पावनखिंड, जातिवंत घोड्यांचे स्टड फार्म, फुलपाखरू उद्यान, कोकणदर्शन पॉईंट, आंबा घाट
आंब्याचे वैशिष्ट्य
जगातील सगळ्यात छोटा पतंग ग्रास ज्वेल तर जगातील सगळ्यात मोठा पतंग ऍटलास मॉथ, जगातील सगळ्यात लहान हरीण पिसुरी हरीण (माउस डियर) जगातील सगळ्यात मोठा बैल गवा (इंडियन गौर), लांब शेपूट असणारा स्वर्गीय नर्तक, महाराष्ट्राचे चारही आयकॉन अर्थातच राज्यपक्षी हरियल (यलो फुटेड ग्रीन पिजन), राज्यफुलपाखरू निळी शंखिणी (ब्लु मॉर्मन), राज्यप्राणी शेकरू, जगाच्या पाठीवरील सर्वात मोठी शेंग गारंबी (ऍन्टाडा), फक्त भारतात ते हि फक्त पश्चिम घाटाच्या घनदाट जंगलात सापडणार मलबारी चापडा (मलबार पिट वायपर)
या अरण्यात मोर, पावशा (हॉक कक्कू), कुतुर्गा (ब्राऊन हेडेड बार्बेट), सुभग (आयोरा), लालबुडय़ा बुलबुल, दयाळ व शिंपी, धनेश (ग्रे हॉर्नबिल), पांढऱ्या छातीचा खंडय़ा, पांढऱ्या भुवईचा धोबी, लांब शेपटीची भिंगरी (वायर टेल स्वालो), वेडा राघू व पाकोळी, निळ्या डोक्याचा कस्तूर (ब्लू-कॅप रॉक थ्रश), मलबार कस्तूर (मलबार विस्लिंग थ्रश), पांढऱ्या गळ्याचा सातभाई (पफ-थ्रोटेड बॅबलर), यांसारखे पक्षी तर बिबटय़ा, सांबर, भेकर, गवा यांच्याबरोबरच कधीकधी एखादा फिरस्ता वाघसुद्धा दिसण्याची शक्यता असते.
मात्र रस्त्याने पायी निघाल्यासच या वन्यजीवांच्या दर्शनाची शक्यता असते. रात्रीच्या भटकंतीत बाजूच्या शेतातून बेडकांचे व झाडांवरून निरनिराळ्या प्रकारच्या वृक्षबेडकांचे (ट्री फ्रॉग) आवाज एक मस्त गूढ-रम्य वातावरण तयार करतात. तर झाडावर वाढलेली लुमिनियस फंगस बुरशी हडळीचा फील देऊन जाते. अशा या रौद्र सह्य़ाद्रीचे तितकेच लावण्यमयी रूप पाहावे तितके थोडेच.
टीप – या परिसरात जळू लागण्याची शक्यता लक्षात घेऊन मीठ किंवा तंबाखू सोबत ठेवलेली बरी.
कसे जाल?
१. पुण्याहून आंब्याला जाण्यासाठी पेठनाक्यापासून – शिराळा – मलकापूर – आंबा असे २४७ किमीचे अंतर आहे.
२. पुण्याहून कोल्हापुरात येऊन जायचे असल्यास पन्हाळामार्गे – शाहूवाडी – आंबा असे ३०३ किमीचे अंतर आहे.
३. रेल्वेने जाणाऱ्यांसाठी पुणे ते कोल्हापूर असा रेल्वे प्रवास करून कोल्हापूर ते रत्नागिरी, गणपतीपुळे, लांजा या गाड्यांनी प्रवास करून आंब्यात उतरावे लागेल. तेथून पुढे मात्र प्रायव्हेट व्हेईकलवरच भिस्त ठेवावी लागेल.