Categories: आरोग्य

पुणे-मुंबईतून कोल्हापूरात यायचंय… मग ‘यांची’ परवानगी हवीच!

कोल्हापूर। आपल्या जवळच्या नातेवाईकांना, ग्रामस्थांना कोरोनाचा प्रादूर्भाव होवू नये यासाठी, पुणे-मुंबईमधून येणाऱ्या लोकांनी जिल्ह्यात येण्यापूर्वी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घ्यावी. केवळ दक्षता म्हणून हा निर्णय घेतला असून याला आपण सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले.

पालकमंत्री पाटील म्हणाले, गेले दोन महिने ४० लाख जिल्हावासियांचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्याचं काम प्रशासनाने केलं आहे. १ मे पासून जिल्ह्यात ५ हजार गाड्या मुंबई-पुण्यातून आल्या आहेत. वैद्यकीय सारख्या कारणाने पास घेवून किमान १५ ते २० हजार व्यक्ती आल्या आहेत. या सर्वांची स्वॅब तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वॅब घेण्यासाठी दोन दिवस आणि तपासणी अहवाल येण्यासाठी दोन दिवस लागतात. 

यापूर्वीच्या व्यक्तींचा अहवाल येईपर्यंत थोडेदिवस आपण थांबावं आणि गरज असेल तरच पुढचे ४-५ दिवस यावे. जिल्ह्यात प्रादूर्भाव वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून संबंधित जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्याशी बोलून त्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.

आहात त्या ठिकाणी आपली राहण्याची व्यवस्था असेल तर जिल्ह्यात येण्याचे टाळावे. आपण जिल्ह्यात आल्यानंतर आपल्या घरच्यांना, ग्रामस्थांना भेटणार आहात. हा प्रादूर्भाव जवळच्या लोकांना होवू नये, ही या मागची दक्षता आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी शेवटी केले.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: kolhapur news update