Categories: Featured

हवामान अंदाज- पुणे, मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाची शक्यता!

मुंबई।२३ डिसेंबर। राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली असून सलग ४ ते ५ दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने आपल्या पिकांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार लक्षद्वीप क्षेत्रापासून उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत पर्यंत एक कमी दाबाचा पट्टा विस्तारत आहे.

वाऱ्यांचे संगम क्षेत्र उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विकसित होण्याची शक्यता आहे. या दोन्ही गतिविधींच्या संयुक्त प्रभावामुळे मुख्यत: मुंबई, पुणे, डहाणू, रत्नागिरी, नाशिक, मालेगाव, जळगाव, अकोला, नागपूर आणि अमरावती या ठिकाणी २४ ते २६ डिसेंबर दरम्यान पाऊस हजेरी लावेल अशी अपेक्षा आहे. वास्तविक, विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रात आज सायंकाळनंतर पाऊस सुरू होईल आणि काही ठिकाणी तुरळक सरी अनुभवल्या जावू शकतील असाही अंदाज आहे.

त्याचप्रमाणे लातूर, हिंगोली, जालना आणि बीडसह इतर अनेक शहरांमध्ये तीन दिवसांत तुरळक सरींची तर अहमदनगर, औरंगाबाद आणि महाबळेश्वरमध्ये विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. हवामानातील या गतिविधींच्या पार्श्वभूमीवर पुढील तीन ते चार दिवस किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची अपेक्षा आहे. तथापि, पाऊस थांबल्यानंतर साधारण २७ डिसेंबरपासून उत्तर / ईशान्येकडून वारे वाहू लागल्याने रात्रीच्या तापमानात पुन्हा घट होईल.

देशभरातील हवामानाची स्थिती –

दक्षिण भारतात, एक ट्रफ रेषा दक्षिणपूर्व अरबी समुद्रापासून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत विस्तारित आहे आणि तामिळनाडू किनाऱ्यावर ईशान्य वाऱ्यांनी वेग वाढविला आहे. त्यामुळे तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात पाऊस वाढेल. या भागांमध्ये एक किंवा दोन मध्यम सरींसह हलका पाऊस होईल. लक्षद्वीपमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तथापि, तेलंगाणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचे हवामान कोरडे राहील.

दरम्यान, मध्य भारतात, विपरीत चक्रवाती परिस्थिती ओडिशावर तयार झाली आहे आणि या प्रणालीमुळे दक्षिण-पूर्वेकडून आर्द्र वारे विदर्भ आणि मध्य प्रदेशात वाहत आहेत आणि ते कोरडे व थंड उत्तर पश्चिम दिशेने येणाऱ्या वाऱ्यांमध्ये विलीन होत आहेत. या संगमामुळे, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मध्य प्रदेशातील काही भागात विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. छत्तीसगड, गुजरात आणि दक्षिण राजस्थानचे हवामान कोरडे राहील.

उत्तरेकडील, उत्तर पश्चिम दिशेने थंड वारे देशाच्या मैदानावर सुरूच राहतील. पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथे धुक्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरच्या उत्तर भागांमध्ये पाऊस व बर्फवृष्टी होईल. तर दिल्लीचे प्रदूषण खराब ते अगदी खराब श्रेणीत राहील.

पूर्व आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये कोणतीही महत्त्वपूर्ण हवामान प्रणाली सध्या दिसून येत नाही. त्रिपुरा मेघालयच्या एक दोन ठिकाणी धुके असण्याची शक्यता आहे. झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथे सकाळच्या वेळी धुके दिसू शकतात. कोलकाता, रांची, पटना आणि गुवाहाटी येथे हवामान कोरडे राहील.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: weather forecast dec शेतकरी हवामान अंदाज