पुणे | गेले दोन दिवस राज्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. आज कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
या ठिकाणी पहा ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर पर्यंतचा पुणे वेधशाळेचा हवामान अंदाज
गेल्या तीन दिवसांपासून अरबी समुद्र, दक्षिण गुजरात आणि दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. कोकण भागातील काही ठिकाणी झालेल्या जोरदार पावसाने भात काढणीची कामे खोळंबली आहेत.
कोकण आणि मध्यमहाराष्ट्राबरोबरच मराठवाड्यातही हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. २८ सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. पश्चिम राजस्थान आणि पंजाबच्या काही भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. तर शनिवारपासून राजस्थान आणि उत्तरप्रदेशच्या काही भागातून मान्सून परतीच्या वाटेला लागला आहे.