Categories: Featured

मोक्षाच्या दारात सुस्वागतमची पाटी – सांगली महापालिकेचा प्रताप

स्नेहल शंकर
घरांची प्रवेशद्वारे असो वा एखादा सोहळा पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी सुस्वागतम अशी पाटी असते. पण सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने चक्क शव दाहिनीवरच सुस्वागतमाची पाटी लावली आहे. यावरून ‘एखाद्या मृतदेहानं स्वागत समारंभावर बहिष्कार टाकलाय की नाही हे पाहण्यासाठी भाजपाने आता स्वतंत्र यंत्रणाच उभी करावी.’ असा खोचक सल्ला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष शुभम जाधव यांनी सत्ताधारी भाजपला दिला आहे.

सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमीत महापालिका क्षेत्रातील पहिल्या वहिल्या गॅस शवदाहिनीचे काल लोकार्पण करण्यात आले. मात्र लोकार्पण करताना महापालिकेने त्या शवदाहिनीवरच सुस्वागतमाची पाटी लावली. मात्र हा प्रकार अनाहूतपणे घडला असल्याचं महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मेल्यानंतर माणसाची सुटका होते असं म्हणतात. वास्तविक मरण हा दुःखाचा आणि भावनिक प्रसंग असतो. मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. असे असताना महापालिकेने सुस्वागतम म्हणणे कितपत योग्य आहे असा प्रश्न सामान्यांकडून व्यक्त केला जात आहे. पण आता खुद्द महापालिकेनेच मृतदेहाच्या स्वागताची तयारी केल्याने, येणाऱ्या मृतदेहाला ते स्वीकारावेच लागेल अशी उपरोधिक टीकाही विरोधकांकडून करण्यात येत आहे.

याची नोंद महापालिका कशी ठेवणार? सोशल मीडियावर विचारले जाताहेत तिखट प्रश्न
दरम्यान या प्रकारानंतर सोशल मीडियावर याचे तीव्र पडसाद उमटले असून नेटिझन्सकडून यावर टीकेची झोड उडवली जात आहे. महापालिका मृतदेहाचे स्वागत करत असेल तर हे स्वागत मृत व्यक्तींनी स्वीकारलं आहे याची नोंद कशी ठेवणार? जर एखाद्या मृतदेहाने या स्वागत समारंभावर बहिष्कार टाकला तर त्याची नोंद कुठल्या दरबारात होणार? महापालिकेच्या या पराक्रमामुळे चित्रगुप्त पण बुचकळ्यात पडला असेल कारण मृत व्यक्तीचे स्वागत करणे हे त्याचेच अधिकारक्षेत्र आहे. सोशल मीडियावर अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती नेटिझन्सकडून केली जात आहे.

कट्टर हिंदुत्वाची भूमिका मांडणाऱ्या भाजपाचे कृत्य लज्जास्पद
अलीकडच्या काळात देशप्रम असो व धर्मप्रेम सर्टिफिकेट वाटण्याचं काम भाजपाने आरंभिल आहे. कट्टर हिंदुत्वाची भूमिका मांडणाऱ्या भाजपाने हे कृत्य करून हिंदू धर्माचाच अपमान केला आहे. आता मृतदेहाचं स्वागत पण करण्याचं यांनी ठरवलंच आहे तर एखाद्याला मोक्षप्राप्त झाला कि नाही बघून त्याच सर्टिफिकेट देण्यासाठी यांनी वेगळी यंत्रणा बसवावी. झाला प्रकार अत्यंत लज्जास्पद व संतापजनक असून त्यांनी तात्काळ जनतेची माफी मागण अपेक्षित आहे. माफी न मागितल्यास त्यांच्या जनतेप्रती निर्ढावलेल्या वृत्तीचचं दर्शन घडणार आहे.  – शुभम जाधव ( सांगली शहरजिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस)

Snehal Shankar

Journalist