ज्याप्रमाणे सातबारा उताऱ्यावरून व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती याची माहिती मिळते त्याचप्रमाणे प्रॉपर्टी कार्डवरून त्या व्यक्तीच्या मालकीची बिगर शेतजमीन किती, तसेच स्थावर मालमत्ता अर्थात घर, बंगला, व्यवसायाची इमारत या सर्वाची माहिती मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतचं ११ ऑक्टोबर २०२० रोजी स्वामित्व योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्डचं वितरण केलं. परंतु हे प्रापर्टी कार्ड म्हणजे नेमकं काय? ते कुठं आणि कसं काढायचं याची पुरेशी माहिती सर्वसामान्यांना असतं नाही. त्यामुळे या लेखाच्या माध्यमातून याबाबतची सविस्तर माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.
स्वामित्व योजनेच्या माध्यमातून देशभरातल्या गावांचं ड्रोन सर्वेक्षण होणार आहे. त्यातून प्रत्येक घराचा नकाशा, मिळकत पत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेबद्दल माहिती देताना पंतप्रधान म्हणाले, “स्वामित्व योजनेमुळे गावागावातील सामान्य नागरिक आत्मनिर्भर होणार आहे. पुढच्या तीन ते चार वर्षांत देशातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक घराला प्रॉपर्टी कार्ड देण्यात येईल. यामुळे तुमचं घर तुमचचं आहे, तुमचा त्यावरील अधिकार कायदेशीर आहे, तिथं काय करायचं ते तुम्हीच ठरवणार आहात. सरकारला देखील यात दखल देता येणं शक्य होणार नाही. त्यामुळे येत्या काळात स्वामित्व योजनेमुळे गावांमध्ये ऐतिहासिक परितवर्तन होणार असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी बोलून दाखवला आहे.
प्रॉपर्टी कार्ड कसं काढायचं?
प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम ऑनलाईनवर bhulekh.mahabhumi.gov.in ही सरकारी वेबसाईट सर्च करावी लागेल. ही महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट आहे.
या वेबसाईटवर उजवीकडे तुम्हाला Digitally Signed 7/12 किंवा ‘डिजिटल स्वाक्षरीत सातबारा पाहण्यासाठी इथं क्लिक करा’ हा पर्याय दिसेल.
DOWNLOAD FACILITY FOR DIGITALLY SIGNED 7/12, 8A AND PROPERTY CARD – असं या पेजचं शीर्षक आहे. यातील डिजिटल स्वाक्षरीतलं प्रॉपर्टी कार्ड कसं काढायचं, हे आपण विचारात घेऊया..
प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला या पेजवर लॉग-इन करायचं आहे. सातबारा काढताना वापरलेलं युजरनेम आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग-इन करू शकता. अथवा फोन नंबर टाकूनही तुम्ही प्रॉपर्टी कार्ड पाहू शकता. यासाठी OTP Based Login या पर्यायावर क्लिक करावं लागेल.
त्यानंतर खालच्या रकान्यातील Enter Mobile Number मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून Send OTP या पर्यायावर क्लिक करावं लागेल. पर्यायावर क्लिक केल्यावर, OTP sent on your mobile असा मेसेज तिथं येईल. या मेसेज मध्ये आलेले अंक जसेच्या तसे तुम्हाला Enter OTP या रकान्यात टाकावे लागतील. त्यानंतर Verify OTP या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर सातबारा नावाने एक पेज ओपन होईल. या पेजवर Digitally signed 7/12, Digitally signed 8A, Digitally signed Property card, Recharge Account, Payment History, Payment Status असे वेगवेगळे पर्याय दिसतील. यातल्या Digitally signed Property card हा पर्याय तुम्हाला निवडावा लागेल.
“डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड” नावाचं पेज ओपन झाल्यानंतर यामध्ये सुरुवातीला तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे, त्यानंतर जिल्हा आणि मग तुमचं गाव किंवा प्रॉपर्टी ज्या तहसील अंतर्गत येते ते कार्यालय निवडायचं आहे. आणि मग CTS नंबर टाकायचा आहे. CTS अर्थात सिटी सर्व्हे नंबर. याचा अर्थ जमीन ओळखण्यासाठी सरकारी रेकॉर्डमध्ये नोंदवलेला एक नंबर. प्रॉपर्टीशी संबंधित सगळे रेकॉर्ड या नंबरशी संबंधित असतात. पण, जर तुम्हाला CTS नंबर माहिती नसेल तर तुम्ही प्लॉट नंबरही टाकू शकता. त्यानंतर सगळ्यात शेवटी डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करून आपलं प्रॉपर्टी कार्ड डाऊनलोड करता येईल.
असे वाचा प्रॉपर्टी कार्ड –
प्रॉपर्टी कार्ड अर्थात ‘मालमत्ता पत्रक’ असं या कार्डचं शीर्षक आहे. यामध्ये सुरुवातीला गाव, तालुका आणि जिल्ह्याचं नाव दिलेलं आहे. त्यानंतर नगर भूमापन क्रमांक किंवा प्लॉट नंबर आणि त्याचं क्षेत्र किती आहे ते चौरस मीटरमध्ये दिलेलं असतं. हा प्लॉट कुणाच्या नावे आहे ती माहिती हक्काचा मूळ धारक या पर्यायासमोर दिलेली असते. त्यानंतर सगळ्यात खाली एक सूचना दिलेली असते. आणि कोणत्या सरकारी अधिकाऱ्यानं कार्डवर सही केली आहे, त्याचीही माहिती दिलेली असते. हे प्रॉपर्टी कार्ड डिजिटल स्वाक्षरीत असल्यामुळे शासकीय आणि कायदेशीर कामांसाठी वापरता येईल. त्यामुळे आता प्रॉपर्डी कार्ड काढण्यासाठी सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयातही जायची गरज भासणार नाही.