Categories: कृषी ब्लॉग

शेतकरी बंधूनो.. काय आहे महाओनियन? नक्की जाणून घ्या!

शेतकऱ्यांच्या मालकीच्या मूल्यवर्धन साखळ्या किंवा व्हॅल्यू चेन म्हणजे काय?
याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाओनियन. हा ‘नाफेड’ आणि ‘महाएफपीसी’ यांचा भागिदारी प्रकल्प आहे. याला राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे साह्य मिळाले आहे.  महाएफपीसीच्या संयोजनातून कांदा उत्पादक जिल्ह्यातील २५ शेतकरी उत्पादक कंपन्या या प्रकल्पात सहभागी आहेत. प्रत्येक एफपीसीसाठी एक हजार टन याप्रमाणे २५ हजार टन क्षमतेच्या आधुनिक कांदा चाळींची उभारणी यातून सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ता. १ ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्यात सहा कांदा चाळींचे लोकार्पण पार पडले. 

महाओनियन प्रोजेक्टच्या कांदा चाळींमध्ये ग्रेडींग शेड्स, वजन काटे आदी सुविधा आहेत. आंतरराज्य किंवा निर्यातीसाठी डायरेक्ट लोडिंग करता येईल. डिजिटल, इलेक्ट्रॉनिक ट्रेडसाठी उपयुक्त ठरेल, अशी व्यवस्था उभारण्यात आली आहे.

एक ऑक्टोबरला कांद्याचे नवे मार्केटिंग वर्ष सुरू होते. या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या ‘महाओनियन’ या प्रोजेक्टसंदर्भातील या लक्षणीय नोंदी :

 • २५ हजार टनाची क्षमता अस्तित्वात येईल, तेव्हा ‘महाओनियन’ कांद्यामधील सर्वांत मोठे संस्थात्मक स्टॉकिस्ट म्हणून पुढे येईल. कांदा स्टॉक डाटा डिजिटायझेशनची ही सुरवात आहे. भविष्यात मोठे आणि संस्थात्मक स्ट्रक्चर्स उभे राहतील, त्यानुसार स्टॉक नोंदणी करणे सोपी जाईल.
 • महाओनियनच्या कांदा चाळींमुळे, कांद्याची टिकवण क्षमता ट्रॅक करण्यासाठी चांगले सॅंपल उपलब्ध होईल. पाऊसमान, आर्द्रता, डिहायड्रेशन आदींमुळे नेमकी घट किती याचे स्टॅंडर्ड सॅंपल मिळेल. सरकारी यंत्रणांना पुरवठ्यासंदर्भात माहितीसाठी चांगला स्त्रोत निर्माण होईल.
 • नव्या शेती सुधारणा कायद्याअंतर्गत महाओनियन प्रकल्पाला बाजार समितीचा दर्जा मिळणे अपेक्षित आहे. आयातदार व देशांतर्गत खरेदीदारांसाठी खूप मोठा व्हॉल्यूम, तो क्वॉलिटी क्लॅरिटीसह एकाच संस्थेकडून उपलब्ध होईल. नाफेड, किंवा रिटेल कॉर्पोरेट्ससाठी खात्रीलायक पुरवठादार म्हणून महाओनियनला मान्यता मिळेल.
 • महाओनियन मॉडेल अन्य शेतकरी कंपन्या किंवा गटांसाठी पथदर्शक आहे. कांदा उत्पादक गावातील आठ-दहा शेतकरी मिळून असे मोठे स्टॉक स्ट्रक्चर्स उभारण्याची प्रक्रिया महाराष्ट्रात सुरू होईल.

नवी चर्चा, नवी मांडणी

 • महाएफपीसी हा आजघडीला शेतकऱ्यांसाठी काम करणारा सगळ्यात मोठा सोशल तरीही प्रोफेशनल असा एंटरप्राईज आहे. इथल्या संसाधनांची मालकी ही खासगी
  व्यक्तिंची नाही, तर शेतकऱ्यांची आहे. महाओनियन प्रकल्पामुळे महाएफपीसीच्या कामकाजाची मूर्त, फिजिकल स्वरूपाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे.
 • महाओनियनच्या ई लोकार्पण कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: हजेरी लावली. सहा ठिकाणाहून प्रकल्पधारक कंपन्यांच्या ई सहभाग, पुण्यातून
  महाएफपीसीद्वारे नेटके संयोजन यामुळे शेती सोशल मीडीयातून कार्यक्रम सर्वदूर पोचला. शेतकरी कंपन्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
 • भविष्यात शेतकरी कंपन्यासाठीच्या संसाधनांची उभारणी कुठल्या पद्धतीने व्हायला हवी, याचा वस्तूपाठ महाओनियन प्रकल्पातून सेट झालाय. प्रकल्प थीम, सहभागीदार,
  फंड्स उभारणी, प्रकल्प अमंलबजावणी याबाबत कुठलीही तडजोड न करता, शास्त्रीय – वस्तूनिष्ठ कसोट्यांवर प्रकल्प उभारणी झाली आहे.
 • गेली चार दशके कांद्यासंदर्भातील चर्चा केवळ समस्याकेंद्रीत होती. महाओनियनमुळे उपाययोजना केंद्रीत चर्चेला सुरवात झाली आहे. सर्व कांदा उत्पादक गावांत आता उत्पादनापासून ते विक्रीपर्यंतची प्रक्रिया वैयक्तिक न राहतात सामूहिक, इंटिग्रेटेड पद्धतीने कशी करता येईल, याबाबत पुढाकार घेतला जात आहे.
 • केंद्रीय कृषी मंत्रालयाकडील 19-20 मधील नोंदीनुसार देशाच्या कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 43 टक्के आहे. नाशिक, नगर आणि पुणे अशी भौगोलिक सलगता असलेल्या अशा कांदा उत्पादक पट्ट्यात (उत्पादन, साठवणुक,थेट विक्री) शेतकऱ्यांच्या मालकीच्या व्हॅल्यू चेन उभ्या राहू शकतात, असा विश्वास ‘महाओनियन’ने दिला आहे.

दीपक चव्हाण (लेखक शेती अभ्यासक आहेत)

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: apmc market rates maharashtra MAHAFPC maharashtra apmc list msamb msamb app msamb mango msamb mango online NAFED panan mandal office pune maharashtra tur online registration नाफेड