कोल्हापूर | प्रामाणिक पणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी शासन कधी मुहूर्त काढणार? असा उद्विग्न सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजित घाटगे यांनी उपस्थित केला आहे.
राज्य शासनाने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत, प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून पन्नास हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. प्रोत्साहनपर अनुदानासाठी ज्या शेतकऱ्यांनी जून अखेरपर्यंत कर्ज भरले अशा शेतकऱ्यांनाच हा लाभ देणार असल्याचे सरकारच्यावतीने सांगण्यात आले होते. या गोष्टीला सव्वा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. तरी सुद्धा प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय शासनाने घेतलेला नाही. त्यामुळे हे अनुदान देण्यास शासन कधी मुहूर्त काढणार? असा सवाल घाटगे यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. मात्र या योजनेत दोन लाख रूपयांच्या आतील थकबाकीदार शेतकऱ्यांना पात्र धरले. मात्र या कर्ज माफीमध्ये प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार केला नव्हता. या विरोधात घाटगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळावे, दोन लाख रूपयांच्या वरील थकबाकीदार शेतक-यांना सुद्धा कर्जमाफी मिळावी अशा मागण्या करण्यात आल्या होत्या.
शासनाने प्रामाणिक शेतकऱ्यांसाठीच्या या मागण्यांचा विचार करून, ५० हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती.त् यासाठी शेतक-यांनी त्यांच्या नावावरील कर्ज ३० जून अखेर भरावे. म्हणजे हे अनुदान देता येईल असे सांगितले होते. शेतकऱ्यांनी हे कर्ज भरून आता सव्वा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. मात्र शासनाकडून याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करून आम्ही चूक केली का अशी भावना शेतकरी वर्गात उमटू लागली आहे. कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर हा मोठा अन्याय असून शासनाने हे अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी घाटगे यांनी केली आहे.