कोल्हापूर।जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्विकारायला महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी अनुत्सुकता दर्शवल्यानंतर आता कोल्हापूरच्या पालकमंत्री पदी कोण या चर्चेने जिल्ह्यात राजकीय चर्चांना जोर आलाय. महाविकास आघाडी सरकारच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पालकमंत्रीपदाच्या नियुक्ता नुकत्याच जाहीर केल्या असून यामध्ये जिल्ह्यातील ३ पैकी २ मंत्र्यांच्या वाट्याला पालकमंत्रीपद आले आहे. पण या दोघांनाही डावलून कोल्हापूरचे पालकमंत्रीपद बाळासाहेब थोरात यांना देण्यात आले आहे.
कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादीचे नेते व सध्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि कॉंग्रेसचे नेते व सध्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यात रस्सीखेच सुरू होती, त्यामुळेच या दोघांच्या वादात परजिल्ह्यातील व्यक्तीला पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिल्याची चर्चा आहे. परंतु खुद्द बाळासाहेब थोरातांनीच कोल्हापूरचे पालकमंत्रीपद स्विकारण्यास नाराजी दर्शवल्याने पुन्हा पालकमंत्री पदाबाबत रस्सीखेच सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यापेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांनाच पालकमंत्रीपद आपल्या नेत्याला मिळावे अशी अपेक्षा अधिक आहे. परंतु जोपर्यंत बाळासाहेब थोरात आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात समोरासमोर बोलणी होत नाहीत तोपर्यंत यावर तोडगा निघणार नसल्याचे समजत आहे. मुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात यांच्या भेटीनंतर जर बाळासाहेबांनी पालकमंत्रीपद स्विकारण्यास नकार दिला तर शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या चर्चेतून पालकमंत्री निश्चित केला जाण्याची शक्यता आहे.
सध्याची गणिते पाहता बाळासाहेब थोरात हे पी.एन.पाटील यांना अधिक जवळचे आहेत. त्यामुळे सहाजिकच बाळासाहेब थोरात पालकमंत्री झाल्यास जिल्ह्यात पी.एन. गटाचा दबदबा वाढणार आहे. तर सतेज पाटील यांना पालकमंत्री केल्यास जिल्ह्यातील राजकारणात सतेज पाटील गट आणखी प्रभावी होणार आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरातांकडूनच राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांच्या नावाला पसंती दिली जाण्याची शक्यता अधिक असल्याची चर्चा आहे. याबदल्यात बाळासाहेब थोरात स्वतःच्या जिल्ह्याचे अर्थात अहमदनगरचे पालकमंत्री पद घेऊ शकतात. अहमदनगरचे पालकमंत्री पद सध्या हसन मुश्रीफ यांना देण्यात आले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची नियुक्ती कुणाच्या पथ्यावर अधिक पडणारी आहे याची राजकीय गणिते मांडूनच हा निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.