Categories: Featured राजकीय

अहो फडणवीस… राज्य संकटात असताना ‘ज्याला जनादेश नाही, त्याला धनादेश नाही’ हे घाणेरडं राजकारण तुम्हाला शोभतं का?

कोरोना विषाणूमुळे राज्य धोक्यात असताना राज्यातील काही लोकांच्या डोक्यात अद्यापही असंवेदनशीलपणाचे राजकारण सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्याच वाटेने जाताना दिसत असून त्यांच्या घाणेरड्या राजकारणाने कळस गाठल्याचे दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ३० मार्चला आपल्या ट्विटर हॅंडलवरून कोरोनासाठी PM Cares फंडातच मदतनिधी गोळा करण्याचे आवाहन केलंय. त्याचबरोबर त्यांच्या या ट्विटनुसार ‘ज्याला जनादेश नाही, त्याला धनादेश नाही’ ही मोहिम महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांविरोधात आणि महाविकास आघाडी सरकारविरोधात सोशल मिडीयात चालवली जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या या पोस्टमुळे एकेकाळी मुख्यमंत्री सहायता निधीत मदत जमा करण्याचे आवाहन करणाऱ्या एका मुख्यमंत्र्यानेच आता अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री सहायता निधीत पैसे जमा करू नका असाच संदेश दिला आहे. आणि त्याला अनुसरून त्यांच्या समर्थकांनी ‘ज्याला जनादेश नाही, त्याला धनादेश नाही’ अशी सोशल मिडीया कॅंपेनही राबवली आहे. मात्र असे असताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारविरोधात सुरू असलेल्या या मोहिमेबद्दल कोणतेही भाष्य केलेलं नाही. याचाच अर्थ ही मोहिम त्यांच्या मुकसंमतीने चालवली जात असल्याचे स्पष्ट आहे. परंतु देवेंद्र फडणवीसांच्या मुकसंमतीने चालणाऱ्या या मोहिमेवर सोशल मिडीयावर नेटकऱ्यांनी आपला संतापही व्यक्त केलाय.

महाविकास आघाडी सरकारच्या ऑफिशियल फेसबुक पेजवर याबाबत मत व्यक्त करण्यात आले असून यामध्ये… कोरोनाचं संकट सर्वाधिक जर कोणत्या राज्याला भेडसावत असेल तर ते महाराष्ट्राला. आणि अशा परिस्थितीत माजी मुख्यमंत्री फडणवीस अतिशय घाणेरडं राजकारण करताना दिसतायत. आजघडीला राज्यातील प्रत्येक लोकप्रतिनिधी, कर्मचारी, समाजसेवी संघटना या आपापल्या परीने मुख्यमंत्री सहाय्यता कोशात आपले योगदान देताहेत. आणि हा माणूस प्रधानमंत्री सहाय्यता कोशाला निधी देण्याबाबत लोकांना आवाहन करतोय. याचीच री ओढत भाजपच्या काही नीच कार्यकर्त्यांनी ‘ज्याला जनादेश नाही त्याला धनादेश नाही’ यासारखे राज्यद्रोही अभियान सोशल मीडियात चालवले आहे.

माझी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती आहे की वेळीच या विषवल्लीला ओळखा आणि आपला महाराष्ट्र धर्म जपा. आज राज्याला तुमच्या मदतीची गरज आहे. फुल ना फुलाची पाकळी आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा करा. धन्यवाद.! असे म्हणटले आहे. ही पोस्ट – डॉ. सुरज मोटे, उस्मानाबाद यांच्या नावानिशी पोस्ट करण्यात आली आहे. 

एकूणच सध्याच्या घडीला राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन लढणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या समर्थकांनी सुरू केलेले राजकारण महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारे असल्याचे मत सुज्ञ महाराष्ट्रवासियांकडून व्यक्त होत आहे.  

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: PM cares fund कोरोना ठाकरे सरकार देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सरकार महाविकास आघाडी मुख्यमंत्री सहायता निधी