Categories: Featured आरोग्य सामाजिक

वाचाः मी का जीवंत आहे, म्हणून हात आपटू लागलो… कारण सह्याद्रीच्या डोंगरातून आलेल्या शेकडो गिधाडांना आता ताजं मांस हवं होत..!

#२०_जुलै_२०२० रपारप पाऊस पडत होता. दुपारचे एक वाजलेले. कुट्ट काळे ढग डोक्यावर जमा झाल्यानं भर दुपारी अंधार पडलेला. पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकात उभा होतो. समोरच्या दुकानात भिजलेलं कॅलेंडर दिसलं. जवळ जात त्यावरची तारीख पाहिली. आज २० जुलै २०२०. दर्श सोमवती अमावस्या. बरोबर सहा महिन्यापूर्वी पुण्यात कोरोनाचा पहिला पेशंट सापडला होता. गळ्यातला आंवढा गिळत समोर पाहिलं. सिग्नलच्या खांबाला लागून लाल सदरा घातलेल्या माणसाची बॉडी पडलेली. दोन मरतुकडी कुत्री त्या माणसाचे गपागप लचके तोडत होती. लचके तुटत होते तसं त्याचं रक्त पावसाच्या पाण्यासोबत वाहत चाललेलं. पण, आवाज कसलाच नाही. आता ते सवयीचं झालेलं.

छत्री उघडली आणि शनिवारवाड्याच्या दिशेनं निघालो. प्रभात थिएटरसमोरच्या ड्रेनेजजवळ दोन लहान लेकरांची आणि एका बाईची बॉडी अडकलेली. त्यावर कावळे बसलेले. कचाकच चोच टोचवत ते कावळे मनसोक्त पोट भरत होते. बाजूच्या गटारात सोन्याच्या दागिन्यांचा खच पडलेला. काळ्या पाण्यातही तो चमकत होताच. तरातरा पावलं टाकत शनिवारवाड्याजवळ गेलो. माणसाच्या मृतदेहाचा उकिरडा तिथं साचलेला. हागणदारीत वास येतो, त्याहून उग्र वास नाकात जाऊ लागला. कुणाचा डोळा बाहेर आलेला तर कुणाच्या छातीत अळयांचा खच झालेला. ओकारीच आली. डोळे बंद करुन छत्री फेकून तसा माघारी फिरलो आणि बाजीराव रोडनं उलटा पळत सुटलो. लक्ष्मी रोडवर आलो. दम खात फुटपाथवर बसलो. डोळ्यातून पाणी येत होतं. रस्ते ओस पडलेले. दुकानांची तोडफोड झालेली. रस्त्यावर नोटा सोन्या चांदीचे दागिने दगडगोड्यांसारखे पडलेले. पाऊस कमी व्हायचं नाव घेईना. स्वत:ला सावरलं आणि तसाच चालत शनीपारजवळ आलो. रस्त्यावर भिकारी मरुन पडलेला. मर्सिडीजमध्ये लठ्ठ माणूस मेलेला. बुरख्यावाली बाई पाण्यात भिजून फुगलेली तर तिच्याशेजारीच साडीवाल्या बाईची बॉडी सडलेली. पलीकडं धोतरावाल्याच्या पायावर माशा बसलेल्या तर रोडच्या या बाजूला लाल दाढीवाल्याच्या तोंडात मुंग्या गेलेल्या. कोरोनानं माणसाच्या डोक्यातल्या जातीधर्माच्या सपशेल चिंधड्या केलेल्या. प्रत्येकजण मेलेला. सडलेला.

अचानक गाडीचा आवाज आला म्हणून अभिनव कॉलेजच्या दिशेनं धावत निघालो. चौकात एक गाडी येऊन थांबलेली. मी मोठमोठ्यानं आवाज देत गाडीच्या दिशेनं पळत निघालो. गाडीतून एकजण उतरुन हॉटेलचे शटर तोडत होता. त्याच्या तोंडाला मास्क लावलेलं. मी त्याला आवाज दिला तशी त्यानं हातातली कटावणी माझ्या दिशेनं भिरकावली आणि गाडीत जाऊन बसला. गाडी चालू करुन स्वारगेटच्या दिशेने सुसाट गेला. मी गाडीकडं पाहत होतो. गाडीत मास्क लावून बसलेली लहान लेकरं माझ्याकडं पाहत होती. त्यांच्या डोळ्यात भीती होती. माझ्याही डोळ्यात भितीच होती. चौकात गुडघे टेकवले आणि तोंडाला हात लावून मोठमोठ्यानं ओरडू लागलो. मोठमोठ्यानं रडू लागलो. मी का जीवंत आहे, म्हणून हात आपटू लागलो. क्षणभरानं डोळे पुसले आणि समोरच्या भिंतीकडं पाहिलं. अभिनव कॉलेजच्या मुलांनी तिथं पेंटीग केलं होतं. कोरोनापासून स्वत:ला वाचवा. गहाळ राहू नका. प्रशासनानं सांगितलेले नियम पाळा, स्वतःला वाचवा, आपल्या पुण्याला वाचवा. तारीख होती २३ मार्च २०२०.

सह्याद्रीच्या डोंगरातून पुण्यात आलेली शेकडो गिधाडं झाडावर बसुन माझ्याकडं पाहत होती. सडलेली माणसं खाऊन ती कंटाळली असावीत. बहुतेक त्यांना आता फ्रेश मांस हवं होतं. नितीन थोरात

Team Lokshahi News