Categories: Featured आरोग्य

ग्रामीण भागात पेशंटना तपासण्यास डॉक्टर ‘का’ देत आहेत नकार?

कोल्हापूर। ग्रामीण भागातील डॉक्टर कोरोनाच्या भितीने सध्या रूग्णांची तपासणी करण्यास नकार देत असल्याचे दिसू लागलं आहे. सर्दी खोकल्याच्या पेशंटना तर न बघताच औषधे लिहून दिली जात असल्याची रूग्णांकडून तक्रार सुरू झाली आहे. काही डॉक्टर आम्हाला हिरो व्हायचे नाही, आमची पण लहान लहान मुळ आहेत, आम्हाला पण कुटूंब आहे अशी उत्तर देऊन रूग्णांना टाळत आहेत. ही बाब प्रशासनाच्या ध्यानात आल्यानंतरही फारसा फरक पडला नसल्याचे दिसत आहे. 

याबाबत राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यानी सांगितले की,  ग्रामीण भागातील खासगी डॉक्टर चांगले काम करत आहेत. पण, काही डॉक्टर असे आहेत, जे कोरोनाच्या भितीमुळे रुग्णांची तपासणी करण्यास टाळाटाळ करत आहेत, यासंबंधीच्या तक्रारीही आमच्याकडे आल्या आहेत. यामागे कोरोना व्हायरसची भीती असेल किंवा इतर कोणती कारणं असतील, तरीही गावातील नागरिकांना ताप, सर्दी, खोकला जाणवत असल्यास त्यांचं चेकअप करण्यात यावं, अशा सूचना राज्यातील सगळ्या खासगी डॉक्टरांना दिलेल्या आहेत. तरीसुद्धा एखादा डॉक्टर टाळाटाळ करत असेल, तर आम्ही ग्रामीण भागातील नागरिकांना आवाहन करतो की, संबंधित डॉक्टरची माहिती जिल्ह्यातील सिव्हिल सर्जनकडे द्यावी, या माहितीत तथ्य आढळल्यास डॉक्टरवर कारवाई करण्यात येईल. त्यांचा परवाना रद्द केला जाईल.

दरम्यान डॉक्टरांच्या भितीमागे आणखी एक महत्वाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे, या डॉक्टरांकडे सुरक्षेची कोणतीही साधने उपलब्ध नाहीत, त्यामुळेही ते रूग्णाना तपासण्यास नकार देत आहेत. यामुळे प्रशासनाने ग्रामीण भागात लोकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी योग्य ते नियोजन करणे हे देखील सध्याच्या घडीला महत्वाचे आहे. 

Team Lokshahi News