Categories: बातम्या

27 रूपयांचे पेट्रोल 90 रूपयांपर्यंत का विकलं जातयं? ‘हे’ आहे कारण

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसू लागली आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर इतक्या झपाट्याने का वाढत आहेत, असा प्रश्नही यामुळे नागरिकांना पडू लागला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असेल्या कोरोना महामारीच्या संकटाचा जागतिक अर्थकारणावर मोठा परिणाम झाला होता. मात्र आता यातून सर्व देश सावरत असल्याने अर्थव्यवस्था गतीमान होऊ लागल्या आहेत. आणि त्याचाच थेट परिणाम कच्चा तेलाच्या मागणीत ही झाला असून कच्चा तेलाची मागणी वाढल्याने दरातही वृध्दी झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भारतातील पेट्रोलचे दर शंभरीपार जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तसे पहायला गेले तर पेट्रोलियम उत्पादनानंतर पेट्रोल आणि डिझेलची किंमत फार जास्त नसते. पण सरकारकडून लावण्यात येणाऱ्या विविध करांमुळे पेट्रोल आणि डिझेल सामान्यांपर्यंत पोहोचेपर्यंत 4 ते 5 पटीने महाग होत असल्याचे दिसून येते. यामध्ये प्रामुख्याने केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवर लावल्या जाणाऱ्या अबकारी कराचा (Excise Duty) समावेश आहे. यंदाच्या मे महिन्यात केंद्र सरकारने अबकारी करात वाढ केली होती. सध्याच्या घडीला एक लीटर पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 32.98 व 31.83 इतका अबकारी कर आकारला जातो.

2014 साली देशातील जनतेला मोठी स्वप्ने दाखवत मोदी सरकार सत्तेत आले. महागाई कमी करण्याचा वादा करत सत्ता हस्तगत केल्यानंतर मोदी सरकारने महागाई कमी केली नाहीच उलट ती कित्येक पटीने वाढवण्यास सहाय्य केल्याचेच दिसून येते. 2014 साली पेट्रोल आणि डिझेलवर केवळ 9.48 आणि 3.56 रुपये इतका अबकारी कर आकारला जात होता. मात्र, मोदी सरकारच्या कार्यकाळात या अबकारी करात 13 वेळा वाढ करण्यात आली. तर केवळ तीन वेळा अबकारी कर कमी करण्यात आला.

देशातच तयार होते पेट्रोल-डिझेल
भारत सरकार परदेशातून कच्च्या तेलाची आयात करते. त्यानंतर हे कच्चे तेल शुद्धीकरणासाठी पाठवले जाते. त्यामधून पेट्रोल आणि डिझेलची निर्मिती करून ते पेट्रोलियम कंपन्यांकडे पाठवले जाते. पेट्रोलियम कंपन्या आपल्या नफ्याची रक्कम धरून हे इंधन पेट्रोल पंपापर्यंत पोहोचवतात. त्यानंतर पेट्रोल पंप चालकांचे कमिशन, केंद्र व राज्य सरकारचा कर यामुळे पेट्रोल आणि डिझेलची किंमत सातत्याने वाढत जाते. अबकारी करातून प्राप्त होणारा पैसा (Excise duty) सरकार कल्याणकारी प्रकल्प राबवण्यासाठी वापरते, परंतु दुसऱ्या बाजूला जनता महागाईच्या ओझ्याखाली भरडत असल्याचेही दिसते.

कच्च्या तेलाचे दर किती?
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर सतत वरखाली होतात. सध्या क्रुड ऑईलची प्रतिबॅरल किंमत 52 डॉलर इतकी आहे. यापूर्वी कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली होती. यंदा वर्षाच्या सुरुवातीला कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल 67 डॉलर इतके होते. मार्च महिन्यापर्यंत ते 40 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत खाली आले होते.

पेट्रोलचा सध्याचा दर कसा निश्चित होतो?
बेस प्राइस – 27.37 रुपये
प्रति लीटरभाडे – 0.37 रुपये प्रति लीटर
एक्साइज ड्यूटी – 32.98 रुपये प्रति लीटर
डीलर कमीशन – 3.65 रुपये प्रति लीटर
व्हॅट – 19.00 रुपये प्रति लीटर

Team Lokshahi News