पुणे। सध्या चिकनमध्ये कोरोना व्हायरस असल्याचा खोटा अपप्रचार करून कोंबड्यांचे बाजारभाव पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मागील पंधरवड्यात सुमारे ४० टक्क्यांनी ब्रॉयलर्स कोंबड्यांच्या बाजारभावात नरमाई दिसली आहे. महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सांगली आणि औरंगाबाद या प्रमुख ब्रॉयलर्स उत्पादक विभागात उत्पादन खर्चाच्या तुलनेत सध्या निम्मा दरही मिळत नसल्याचे चित्र आहे. मागील पंधरा दिवसात जवळपास २५ ते ३० रूपये प्रतिकिलोने दर घसरले आहेत.
“कोरोना विषाणूचा प्रसार मानवी संसर्गाद्वारे होतो. जगभरात पोल्ट्री पक्ष्यांतून माणसात कोरोनाचा विषाणू पसरल्याची एकही नोंद नाही. यामुळे भारतीय चिकन व अंडी खाण्यासाठी पूर्णत: सुरक्षित आहेत,” असे केंद्रीय पशुपालन आयुक्त डॉ. प्रवीण मलिक यांनी स्पष्ट केले आहे. देशभरात ब्रॉयलर्स कोंबड्यांच्या बाजारभावात घट झाल्यानंतर पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडियाने यासंदर्भात केंद्रीय पशुपालन विभागाकडे स्पष्टीकरण मागीतले होते. या दरम्यान, पोल्ट्री उद्योजकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय पशूपालन मंत्री गिरिराज सिंह यांची भेट पोल्ट्री उद्योगातील सध्याच्या पेचप्रसंगाकडे लक्ष वेधले. भारतीय पोल्ट्री उत्पादने ही ग्राहकांसाठी सुरक्षित असून, याबाबत जनजागृती घडवण्याचे निर्देश मंत्री गिरीराज सिंह यांनी आपल्या विभागाला दिले आहेत.
“सध्या समाज माध्यमांत काही खोडसाळ पोस्ट्सद्वारे कोरोना विषाणूचा चिकन खाण्याशी संबंध जोडला जातोय. प्रत्यक्षात कोंबड्यांमध्ये कोरोना विषाणू आढळल्याच्या एकाही घटनेची नोंद भारतात नाही. व्हॉट्सअप, फेसबुक आदी माध्यमांवर पक्ष्यांचे शवविच्छेदनाचे फोटो प्रसारित केले जात आहेत. खरे तर ते राणीखेत या रोगाने प्रादुर्भाव झाल्याचे फोटो आहेत, ” असे स्पष्टीकरण मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील कुक्कुटपालनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजित शंकर रानडे यांनी दिले आहे. अनेकदा कुक्कुटपालन व्यवसायासंबधीच्या आकसातून वा गैरसमजातून समाजविघातक मंडळींकडून अशा प्रकारच्या पोस्ट्स व्हायरल केल्या जातात. त्या प्रमाण मानू नयेत, ” असे आवाहनही करण्यात आले आहे.