… म्हणून मोदीजी कांदे उगवतील का? रामदेवबाबांनी उपस्थित केला प्रश्न!

अहमदनगर।९ डिसेंबर।देशात सध्या कांद्याच्या दरवाढीने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलयं. हा कांदा केंद्र सरकारला देखील रडवत असून कांद्याचे वाढते दर सरकारच्या डोकेदुखीचा विषय बनलाय. एकीकडे विरोधकांकडून सरकारवर महागाईमुळे हल्लाबोल सुरू असताना योगगुरू रामदेवबाबांनी मात्र कांदा दरवाढीवरून सरकार तसेच पंतप्रधान मोदींची पाठराखण करण्याचा प्रयत्न केलाय. 

रामदेवबाबांनी नगर जिल्ह्यातील संगमनेर इथल्या गीता महोत्सवाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य करताना, मोदीजी रोजगार द्या, मोदीजी आमच्या शेतीमालाला भाव द्या, मोदीजी महागाई हटवा, कांद्याचे दर वाढले आहेत, मग आता मोदीजी कांदे उगवतील का? असे म्हणत आपण समस्या मोजत बसण्यापेक्षा या समस्येचं निराकरण कसं करता येईल यावर लक्ष केंद्रित करा असा सल्ला दिला. विशेष म्हणजे हा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

संगमनेर येथे बाबा रामदेव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत गीता परिवाराच्यावतीने गीता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३० हजार विद्यार्थ्यांनी भगवतगीतेच्या १२ ते १५ व्या अध्यायांचे सामूहिक पठण केले. यावेळी रामदेव बाबांनी आपल्या स्वत:ला मोठं काम करावं लागेल. आम्ही केवळ दुसऱ्यांवर अवलंबून राहू नये. दुसऱ्यांवर अवलंबून असतात ते दरिद्री, कंगाल असतात. आपल्या कर्माने, पुरुषार्थाने आपलं आणि इतरांचं भाग्य घडवणारे आपल्याला बनायचं आहे”, असा सल्लाही यावेळी मुलांना दिला.