१ डिसेंबरला शाळा सुरू होणार का? आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई | कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनने सध्या संपूर्ण जगभरात दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे सर्व देशांनी पूर्वकाळजी घेत निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारनेही विदेशी प्रवाशांसाठी नियमावली जाहीर केली असून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी झालेल्या बैठकीत केंद्राच्या आदेशाची वाट न पाहता कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या सर्व घडामोडींदरम्यान १ डिसेंबरपासून शाळा सुरु होणार असल्याने पालक चिंतेत आहेत. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबद्दल महत्वाची माहिती दिली आहे.

राजेश टोपे यांना १ डिसेंबरपासून शाळा सुरु होणार का? असे विचारले असता त्यांनी सांगितले की, “अजून ओमिक्रॉनसंबंधी आपल्या राज्याला अद्याप भीती नाही, कारण त्याची लागण झालेली कुठे दिसत नाही. त्यामुळे एकदम चिंता बाळगण्याची गरज नाही. शाळा ठरल्याप्रमाणे १ डिसेंबरला सुरु होतील”.

मास्क वापरणं गरजेचं आहे असं सांगत ओमिक्रॉनची लागण होण्याची गती सध्याच्या व्हेरियंटपेक्षा ५ पटीने जास्त आहे अशी माहिती राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर दिली. यापुढे केंद्राने सांगितलेल्या १३ देशातून येणाऱ्या प्रवाशांना थेट विमानतळावर क्वारंटाईन केलं जाणार असून आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय विमान प्रवास करता येणार नाही असाही निर्णय घेतल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

औरंगाबाद, मुंबई, नागपूर पुणे या विमानतळावर देखील प्रवाशांच्या चाचण्या घेतल्या जातील असंही टोपे यांनी सांगितलं. मुंबईहून दिल्लीला जायचं असेल आणि तिथून पुन्हा मुंबईला यायचं असेल तरीही RTPCR चाचणी अहवाल निगेटिव्ह असायला हवा अशी माहिती देखील टोपे यांनी दिली.