Categories: Featured

छत्रपती घराण्याची बदनामी करणाऱ्याला शिवभक्तांचा चोप… संभाजीराजेंनी दिली ‘फूल्ल सपोर्ट’ प्रतिक्रिया!

मुंबई। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीला चंद्रपूरमध्ये शिवसैनिकांनी चांगलाच चोप दिला. शिवसैनिकांनी केलेल्या या कृत्याचं भाजपचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मनापासून स्वागत केलं. यासंदर्भात त्यांनी शिवभक्तांना उद्देशून लिहिलेली फेसबुक पोस्ट शिवभक्तांमध्ये चांगलीच व्हायरल होत असून संभाजीराजेंचे हे शब्द शिवभक्तांमध्ये स्फुलिंग जागवणारे ठरल्याची भावना शिवभक्तांमधून व्यक्त होतेय.

फुल्ल सपोर्ट!

विमानातून बाहेर आलो आणि मोबाईल मध्ये शिवभक्तांनी छत्रपती घराण्याची बदनामी करणाऱ्या इसमाला चोप दिलेले व्हिडीओ पाहायला मिळाले. माझ्या सुद्धा मनातली इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान वाटले. अशा प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त जागीच केला तर दुसरा कुणी धाडस करणार नाही.मी कायदा मानणारा, कायद्याचे पालन करणारा, शिवरायांचा वंशज आहे. पण ह्या प्रकरणात माझा सुद्धा संयम सुटला होता. मी त्या सर्व शिवभक्तांच्या पाठीमागे ठाम उभा आहे ज्यांनी कामगिरी केली. माझ्यासारखे कोट्यवधी शिवभक्त तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. ही मोहीम फत्ते करणाऱ्या सर्व शिवभक्तांचे मनापासून अभिनंदन!
जय शिवराय, जय शंभूराजे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी सतत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या जितेंद्र राऊत नावाच्या या इसमाला चंद्रपूरकर शिवसैनिकांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या पेंढरी- कोकेवाडा येथे राहणारा हा इसम गेले काही दिवस सातत्याने महाराजांविषयी आक्षेपार्ह आणि निंदाजनक पोस्ट करत होता.

त्याने संभाजी महाराजांबद्दल ही अशाच पद्धतीने फेसबुक पोस्ट केल्या होत्या. स्थानिक शिवसैनिक आणि पोलिसांनी यासंदर्भात त्याला पोलीस ठाण्यात बोलावून समजही दिली होती आणि सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे पोलिसांना रीतसर निवेदन दिले होते. मात्र, यानंतरही या पोस्ट सुरूच राहिल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी पेंढरी-कोकेवाडा या गावात पोचून त्याची बेदम धुलाई केली.  तसेच त्याच्या तोंडाला काळे फासून सिंदेवाही तालुकास्थानी धिंड काढत पोलिसांच्या स्वाधीन केले.

Team Lokshahi News