Categories: Featured तंत्रज्ञान

Zoom App ‘असुरक्षित’; केंद्रीय गृह मंत्रालयाकडून धोक्याचा इशारा!

नवी दिल्ली। ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी वापरले जाणारे चायना मेड ‘झूम’ अ‍ॅप सुरक्षित नाही, असा धोक्याचा इशारा देणारी सूचनावली केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केली आहे. गेल्या काही दिवसात भारतात अनेक यूझर्स खाजगी आणि कार्यालयीन कामकाजासाठी ‘झूम’ अ‍ॅपवर व्हिडिओ कॉन्फरन्स करत असल्याची माहिती आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर घरातून काम करणारे (वर्क फ्रॉम होम) हजारो नोकरदार आणि व्यावसायिक ‘झूम’ला पसंती देत आहेत. मात्र ‘कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडिया’ (सीईआरटी) या राष्ट्रीय सायबर सुरक्षा एजन्सीने ‘झूम’ अ‍ॅपबाबत धोक्याचा इशारा दिला होता. त्यानंतर गृह मंत्रालयाने तातडीची पावलं उचलली आहेत.

सरकारच्या सायबर कोऑर्डिनेशन सेंटर म्हणजेच ‘सायकॉर्ड’ने जारी केलेली ही नवी सूचनावली खासगी क्षेत्रातील नोकरदार किंवा वैयक्तिक अॅपधारक (मित्र आणि नातेवाईकांना व्हिडिओ कॉल) करणाऱ्यांसाठी आहे. कारण सरकारी व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी एनआयसी (राष्ट्रीय माहिती केंद्र) हा प्लॅटफॉर्म बहुतेकदा वापरला जात असल्याचं अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणलं.

शासकीय अधिकार्‍यांना बैठक आयोजित करण्यासाठी कोणतेही ‘थर्ड पार्टी अ‍ॅप’ किंवा सेवा न वापरण्याच्या सूचना आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था आणि सरकारी संस्था यामध्ये ताळमेळ राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर २०१८ मध्ये सायबर ‘सायकॉर्ड’ पोर्टल सुरु केले होते.

‘झूम’ अ‍ॅपवरील कॉन्फरन्स रुममध्ये अज्ञात व्यक्तींना प्रवेश न देणे, पासवर्ड वापरुन हॅकर्सपासून सावध राहणे अशी काळजी घेण्यास वापरकर्त्यांना सांगण्यात आले आहे. गुन्हेगारांना कार्यालयीन कामकाजाची संवेदनशील माहिती मिळण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.

झूम, मायक्रोसॉफ्ट टीम्स फॉर एजुकेशन, स्लॅक, सिस्को वेबएक्स असे ऑनलाइन कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म मीटिंग आणि वेबिनारसाठी वापरले जात असल्याकडे ‘सीईआरटी’ने लक्ष वेधलं होतं.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: MIB India ministry of home affairs video conference video meeting zoom app